पोलिसातील माणुसकी...

 खुनातील मृत महिलेच्या अंत्यविधीसाठी स्वखर्चातून केली मदत

खामगाव : खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी माणुसकीचे दर्शन घडवत खुनातील मृत महिलेच्या अंत्यविधीसाठी स्वखर्चातून मदत करून संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला आहे. अर्थात याला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेही पाठबळ मिळाले असेलच.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सविता प्रकाश सोळंके यांचा १४ मे २०२६ रोजी रात्री पती प्रकाश सोळंके यांनी कौटुंबिक वादातून निर्घृण खून केला. या घटनेमुळे खामगाव शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच मयत महिलेचे नातेवाईक सोलापूर येथून खामगाव येथे दाखल झाले. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मृतदेह सोलापूर येथे नेऊन अंत्यविधी करणे त्यांना शक्य नव्हते. दुःखाच्या या प्रसंगी कुटुंबीय पूर्णपणे हतबल झाले होते. तेवढ्यात मदतीचा हात पुढे आला तो म्हणजे माणूस असलेल्या पोलिसाचा! ठाणेदार रामकृष्ण पवार यांचा !!

यांनी कोणतीही दिखावा न करता स्वतः पुढाकार घेत अंत्यविधीसाठी आवश्यक आर्थिक मदत स्वखर्चातून केली. तसेच अंत्यविधीची सर्व व्यवस्था करून दुःखी कुटुंबाला मोठा दिलासा दिला.

त्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असून, “पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून समाजातील दुःखी आणि गरजू लोकांचे आधारस्तंभ असतात,” हे ठाणेदार पवार यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

खामगाव पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण कृतीमुळे ठाणेदार रामकृष्ण पवार तसेच बुलढाणा पोलिसांविषयी शहरात आदराची भावना अधिक दृढ झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post