मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांची टीका‘हे सरकारच्या अपयशाचे द्योतक’
खामगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि सोने खरेदीबाबत काटकसर करण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यानेच अशी वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
तायडे म्हणाले की, २०१४ मध्ये भाजपने सत्तेत आल्यास सोने स्वस्त होईल, दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून दिले जातील, गंगा नदी स्वच्छ केली जाईल, देशात १०० स्मार्ट सिटी उभारल्या जातील तसेच महागाई दर नियंत्रणात आणला जाईल, अशी अनेक आश्वासने दिली होती. मात्र प्रत्यक्षात यातील बहुतांश आश्वासने अपूर्ण राहिली असून सोने स्वस्त होण्याऐवजी त्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाच्या किमतीही सातत्याने वाढल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
“आज जनतेला सोने खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल कमी वापरा, खाद्यतेलावर काटकसर करा, असे सांगितले जात आहे. याचा अर्थ सरकारने प्रचारात केलेल्या दाव्यांच्या अगदी उलट परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. योग्य वेळी अर्थतज्ज्ञांचे सल्ले विचारात घेतले असते, तर अशी आवाहने करण्याची वेळ आली नसती,” असे डॉक्टर संतोष तायडे यांनी म्हटले.
महिलांना सोने स्वस्त होईल या आश्वासनाद्वारे आकर्षित करण्यात आले होते, मात्र आज त्याच महिलांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले जात आहे, ही बाब योग्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. देशातील वाढती महागाई, रोजगाराचा अभाव आणि स्मार्ट सिटींसारख्या अपूर्ण प्रकल्पांवर सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत, तातडीने सक्षम अर्थतज्ज्ञांची समिती स्थापन करून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ संतोष तायडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार वय केली आहे.

Post a Comment