साहेब... साहेब, आमची तीन अल्पवयीन मुले हरवली; खामगाव पोलिसांच्या तत्परतेने काही मिनिटांत लागला शोध
खामगाव शहरातील तलाव परिसरातील सिंधी कॉलनी भागात तीन अल्पवयीन मुले हरवल्याची घटना घडली. मुलांचा शोध लागत नसल्याने घाबरलेल्या पालकांनी तातडीने खामगाव शहर पोलिस ठाणे गाठून मदतीची याचना केली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी तात्काळ गंभीर दखल घेत शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यांनी पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना केले.
पोलिसांनी परिसरात कसून शोधमोहीम राबविली. पथकातील एका टीमला काही मिनिटांतच ही तीनही मुले सुखरूप अवस्थेत मिळून आली. त्यानंतर मुलांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी मुले शोधून काढल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी खामगाव पोलिसांचे, विशेषतः ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले.
या घटनेमुळे खामगाव पोलिसांची सतर्कता आणि नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

إرسال تعليق