जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदावरील नियुक्त्यांमध्ये पत्रकारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा मंत्री माहिती व जनसंपर्क विभागाचे मंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार समाजातील जनजागृती, संवाद निर्मिती तसेच लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदासाठी पत्रकारांना संधी देणे आवश्यक आहे. यापूर्वीही या पदासाठी पत्रकारांना प्राधान्य देण्याची परंपरा होती, असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच अनेक अनुभवी व ज्येष्ठ पत्रकार अधिस्वीकृतीपासून वंचित राहत असल्यामुळे त्यांना पत्रकार संघटनांचे ओळखपत्र, वृत्तपत्रातील अनुभव तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चारित्र्य प्रमाणपत्राच्या आधारे संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने पत्रकारांचा सन्मान राखत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रमुख संजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment