डी.बी. पथकाची दमदार कारवाई : चोरीतील ५ लाख २० हजारांची रक्कम हस्तगत, आरोपी जेरबंद
खामगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या (डी.बी. पथक) पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपीस अटक करून चोरीस गेलेली ५ लाख २० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. फिर्यादी योगेश प्रमाकर केवारे (वय ४०, रा. शिवाजीनगर, खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप तोडून त्यामधील ५ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित ओम अनिल माने (रा. शिवाजीनगर, खामगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर ९ जून रोजी त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५ लाख २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पोउनि अमित तळोले, पोहेकॉ संदीप टाकसाळ, पोहेकॉ देवेंद्र शेळके, पोहेकॉ निलसिंग चव्हाण, पोकॉ प्रवीण गायकवाड, पोकॉ केशव झाळटे, मपोकॉ सुवर्णा कदम तसेच चालक नापोको नितीन भालेराव यांनी सहभाग घेतला.

إرسال تعليق