खामगाव, दि. 11 जून : तब्बल सहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या सेवानिवृत्त सफाई कामगाराने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आपल्या मुलाला नोकरी देण्याची मागणी केली आहे. खामगाव येथील सेवानिवृत्त सफाई कामगार चंद्रकुमार छगन आठवले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांना निवेदन देऊन लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार आपल्या मुलाला तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाला इशारा दिल्यानंतरही अजून कोणतीही दखल घेतल्या गेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

चंद्रकुमार आठवले हे 31 मार्च 2021 रोजी सेवेतून निवृत्त झाले. नियमानुसार त्यांच्या रिक्त पदावर मुलाला नियुक्ती मिळणे अपेक्षित असतानाही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कार्यवाहीच्या सूचना दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप नियुक्ती मिळालेली नसल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने 30 दिवसांच्या आत मुलाला नियुक्ती द्यावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. अन्यथा 6 जुलै 2026 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. न्यायासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करूनही दखल घेतली जात नसल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता संबंधित विभाग यावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. :::

Post a Comment

Previous Post Next Post