खामगाव : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनांमध्ये चुकीचे निकष लावून तहसील कार्यालयाअंतर्गत १ जानेवारी ते २० मार्च २०२६ या काळात हजारो लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले अर्ज संबंधीतांना आदेश देऊन तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २७ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय क्र. विसयो-२०२५/प्र.क्र.१२/विसयो मंत्रालय मुंबई या परिपत्रकाच्या आदेशानुसार २७ मार्च २०२६ पासून विशेष सहकार्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वाटप करण्याकरीता ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांनी अर्जदारांच्या घरी समक्ष भेट देऊन योजनेसाठी केलेल्या कागदपत्रांची तसेच एकत्रित कुटुंबातील सदस्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करुन लोकेशनसह फोटो पोर्टलवर अद्ययावत करावे असा आदेश लागू लागू केला होता. या आदेशाची अंमलबजावणी ही वास्तविक पाहता २७ मार्च २०२६ पासून लागू होणे अपेक्षीत असतांना तसे न करता चुकीच्या पद्धतीने १ जानेवारी २०२६ ते २० मार्च २०२६ पर्यंत शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने केलेले सर्च अर्ज तहसील कार्यालयाने बाद केले त्यामुळे विधवा निराधार वयोवृद्ध व अपंग बांधवांना ह्याचा मोठा फटका बसला असून हजारो लाभार्थी लाभापासून वंचित झाले आहेत. वास्तविक पहिल्या तारखेला संबंधीत विभागात मिटींग घेऊन सर्व प्रकरणे मार्गी लावण्यात यावेत असा शासनाच्या नियमानसार विषयांकित योजनेतील लाभार्थ्यांच्या प्रकरणाची महिन्याच्या नियम असतांना १ जानेवारी ते २० मार्च २०२६ पावेतो कोणत्याही प्रकारची मिटींग घेतलेली नाही यावरुन संबंधीत विभागाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे तसेच शासन निर्णय आल्यानंतर सर्रासपणे सर्व अर्ज बाद करणे ही बाब निषेधार्ह व खेदजनक आहे. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये महाराष्ट्र शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण होत आहे.
तरी सदर पत्राची योग्य दखल घेऊन उपरोक्त परिपत्रकातील आदेशापूर्वीचे सर्व बाद झालेले अर्ज संबंधीतांना आदेश देऊन तात्काळ मार्गी लावण्यात यावेत अन्यथा विधवा महिला, वयोवृद्ध व अपंग बांधव यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री,ना. श्रीमती सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री, ना. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते, ना.मकरंद पाटील पालकमंत्री, हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी, जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधिक्षक बुलडाणा,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार खामगांव डॉ. बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

Post a Comment