अनुसूचित जाती उपवर्गीकरणास विरोध दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबई येथील मोर्चात सहभागी व्हा...गौतम गवई यांचे आवाहन
खामगाव - एकसंघ असलेल्या अनुसूचित जातीमध्ये घटनात्मक आरक्षणात कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण होऊ नये, बदर समितीचा अहवाल फेटाळण्यात यावा. अ ब क ड असे उपवर्गीकरण हाणून पाडण्यासाठी दिनांक 30 जून 2026 रोजी मुंबई येथे होणाऱ्या भव्य दिव्य व ऐतिहासिक मोर्चासाठी आंबेडकरी जनता तसेच समस्त अनुसूचित जातीतील सर्वच 59 प्रवर्गातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खामगाव येथील आंबेडकरी सामाजिक नेते गौतम गवई यांनी केले आहे.
घटनात्मक एक संघ असलेल्या अनुसूचित जातीसाठी प्रस्तावित अ ब क ड असे उपवर्गीकरण करणे हीच समस्त अनुसूचित जाती करिता खरी फूट आहे. एकत्र असलेल्या या वर्गाला विभागून एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याचा हा प्रस्थापित व्यवस्थेचा डाव आहे आणि तो डाव ताकदीने हाणून पाडण्यासाठी अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांची लाखोच्या संख्येचे उपस्थिती मुंबई येथील विराट मोर्चात आवश्यक आहे. या मोर्चातून सर्वच अनुसूचित जातींची एकी भविष्यातील नव्या समीकरणाची नांदी ठरेल.हे उपवर्गीकरण आम्हास नको आहे म्हणून संपूर्ण आंबेडकरी समाज व चर्मकार तसेच इतर लहान जाती रस्त्यावर उतरलेला आहे. उपवर्गीकरणाविरुद्ध राज्यात मोर्चे व निषेध आंदोलने होत आहेत खामगाव येथे सुद्धा नुकताच यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता. दिनांक 30 जून रोजी मुंबई आझाद मैदान येथे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. पक्ष विरहित हा मोर्चा होणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी सर्व आंबेडकरी संघटना सर्व चर्मकार संघटना अहोरात्र मेहनत घेत आहे. खामगाव जि. बुलडाणा येथून या मोर्चाकरिता मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.तरी या मोर्चाला बळ देण्यासाठी दिनांक 30 जून रोजी मुंबई येथे उपस्थित रहावे असे आवाहन गौतम गवई यांनी केले आहे.

Post a Comment