ज्ञानगंगा अभयारण्यात अवैध चराई प्रतिबंध व वन्यजीव संरक्षणासाठी शांतता समितीची बैठक संपन्न
अकोला : अकोला वन्यजीव विभागांतर्गत ज्ञानगंगा अभयारण्यात अवैध चराईस प्रतिबंध करणे, वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित व समृद्ध करणे तसेच वन विभाग, मेंढपाळ बांधव व गुराखी यांच्यात परस्पर समन्वय आणि सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने बोथा येथील बोथा निसर्ग परिचय केंद्र येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), अकोला यशवंत भाऊराव नागुलवार हे उपस्थित होते. त्यांनी वन्यजीव संरक्षण, अवैध चराईमुळे वनक्षेत्र व वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे दुष्परिणाम, तसेच वन्यजीव संरक्षणासंदर्भातील कायदेशीर तरतुदी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वन विभाग व स्थानिक नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी संवाद, समन्वय आणि परस्पर सहकार्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले
सदर बैठकीस बोथा, मांडणी, गेरू, श्रीधरनगर व माटरगाव येथील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पिंपळगाव नाथ निमखेड, टाकळी ,गारपेट नांदरी, इसलवाडी इत्यादी गावातील मेंढपाळ बांधव, गुराखी तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागास सहकार्य करण्याची तयारी दर्शवून विविध सूचना व मते मांडली.
या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. दीपेश लोखंडे, श्री. प्रकाश सावळे तसेच अधिनस्त वनपाल, वनरक्षक, वनमजूर आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांनी ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीव व जैवविविधतेचे संरक्षण, अवैध चराईला प्रतिबंध आणि वन संवर्धनासाठी वन विभागास सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment