लॉयन्स क्लब खामगावच्या अन्नछत्राला सलग नऊ वर्षे पूर्ण; दहाव्या वर्षात दिमाखदार पदार्पण
खामगाव : लॉयन्स क्लब खामगावच्या वतीने सामान्य रुग्णालय, खामगाव येथे भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी चालविण्यात येणाऱ्या लॉयन्स अन्नछत्र या समाजोपयोगी उपक्रमाला नुकतीच सलग नऊ वर्षे पूर्ण झाली असून, या सेवाकार्याने आता दहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.
विशेष म्हणजे, सलग ३३०० दिवस एकही दिवस खंड न पडता ही अन्नसेवा अखंड सुरू असून, आजपर्यंत सुमारे सहा लाखांहून अधिक गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज प्रेमाने, सन्मानाने व पौष्टिक असे एक वेळचे संपूर्ण भोजन उपलब्ध करून देण्याचे कार्य लॉयन्स क्लब खामगाव सातत्याने करत आहे.
वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी तसेच इतर शुभप्रसंगांचे औचित्य साधून अनेक दानशूर व्यक्ती नाममात्र देणगी देऊन या अन्नदान सेवेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी केवळ खामगावातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध शहरांतून, देशभरातून तसेच परदेशातूनही अनेक सेवाभावी दाते आर्थिक सहकार्य करून या सेवायज्ञात मोलाचा वाटा उचलत आहेत.
या अन्नछत्राचे प्रकल्प प्रमुख म्हणून लॉयन किशोर गरड व लॉयन दिनेश गांधी, तर सहप्रकल्प प्रमुख म्हणून लॉयन डॉ. अशोक बावस्कर, लॉयन डॉ. अशोक केला, लॉयन गिरीश धरमठोक, लॉयन शंकर परदेशी, लॉयन लुकेश मुदलियार, लॉयन मितेश कमानी, लॉयन डॉ. गिरीश पवार आणि लॉयन अमरजीतसिंग बग्गा हे कार्यरत आहेत.
या उपक्रमाला लॉयन्स क्लब खामगावचे अध्यक्ष लॉयन पीनेश कमानी, सचिव लॉयन श्रमिक जयस्वाल आणि कोषाध्यक्ष लॉयन सागर गुर्जर यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.
आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी किंवा कोणताही आनंदाचा दिवस लॉयन्स अन्नछत्राला सहकार्य करून अन्नदानाच्या माध्यमातून साजरा करावा, असे आवाहन लॉयन्स क्लब खामगाव व अन्नछत्र समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
"अन्नदान हेच श्रेष्ठ दान" या भावनेतून गेली नऊ वर्षे अखंड सुरू असलेली ही सेवा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment