खामगाव : शहरातील भुसावळ चौक ते बूरुड गल्ली परिसरात दर गुरुवारी आठवडी बाजाराच्या दिवशी गटारीचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने संतापाची लाट उसळत आहे. याच रस्त्यावर भाजीपाला विक्रेते दुकाने थाटत असल्याने नाल्यांतील दूषित पाणी थेट भाजीपाल्यापर्यंत पोहोचत आहे. परिणामी भाजीपाला जंतू आणि घाण पाण्याच्या संपर्कात येत असून तोच भाजीपाला नागरिकांच्या घरात पोहोचत असल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.

भाजी विक्रेत्यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. चिखल, दुर्गंधी आणि घाण पाण्यामुळे ग्राहक खरेदीसाठी पुढे येत नसल्याने विक्रेत्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेकांनी या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपालिकेने तातडीने नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा निचरा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिकेने दुर्लक्ष करणे धोकादायक ठरत आहे. एखादी साथ किंवा संसर्गजन्य आजार पसरण्याची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ कारवाई करून या भागातील नाली चे पाणी रस्त्यावर येणे कायमचे थांबवावे, अशी जोरदार मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे.



Post a Comment

أحدث أقدم