खामगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; १३.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक



 खामगाव शहर पोलिसांनी घरफोडी आणि वायर बंडल चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले RR कंपनीचे वायर बंडल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण १३ लाख ९७ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी योगेश आशीष भगत (वय २४, व्यवसाय – बिल्डर, रा. बालाजी प्लॉट, खामगाव) यांनी २१ जुलै २०२६ रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार डीपी रोडवरील ब्राह्मण सभा समोरील रामा एलाइट प्रोजेक्ट येथील दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ९७ हजार ३९२ रुपयांचे RR कंपनीचे वायर बंडल चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ३६७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कार्तिक उर्फ सुमित गोपाळ गरुड (२१), वैभव विजय शेलार (२१) आणि तुषार रविंद्र बोडखे (१८ वर्षे १० महिने) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले वायर बंडल आणि गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा मॅक्सिमो मालवाहू (MH-04 GR-1638) असा एकूण १३.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरे यांच्या आदेशानुसार पोउपनि अमोल पाटे व खामगाव शहर पोलिसांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post