डॉ. गोपाल सोनी मृत्यू प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी

खामगाव : खामगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजी व सोनी ब्लड बँकेचे संचालक डॉ. गोपाल सोनी यांच्या येलोडी शिवारात झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवी भिकुलाल जैन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर रवी जैन यांच्यासह बाबा काळे, विकी जैन, अक्षय हातेकर, सुभाष ठाकूर, श्रीराम खेलदार, दीपक कांबळे, शुभम बावस्कर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. सोनी यांच्या मृत्यूबाबत शहरात विविध चर्चा सुरू असून, घटनेच्या दिवशी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, मोबाईल कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप संदेश तसेच घटनास्थळाशी संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच काही व्यक्तींची चौकशी झाल्यानंतरही आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याने संपूर्ण तपास पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, या प्रकरणात शवविच्छेदन फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून करण्यात आल्याने पुढील तपासही सीबीआयमार्फतच करण्यात यावा, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. या घटनेमुळे खामगाव शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सत्य लवकरात लवकर समोर यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post