स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा येथे विश्वकर्मा पूजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
हिवरा (ता. मेहकर) अमोल भोलनकर: स्वामी विवेकानंद आश्रम, हिवरा येथे १२ जुलै २०२६ रोजी सुतार समाजाच्या वतीने भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर, भोजलिंग काका आर्थिक विकास मंडळाचे प्रणेते, अध्यक्ष मालपाणी, स्वामी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, प्रा. डॉ. श्रीराम येरणकर (प्राचार्य, वरवंड बकाल), बुलढाणा जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) मंदार टवलारकर, पीएसआय देविदास फुलंब्रीकर (अकोला), नगररचना विभागाचे सतीश वेरुळकर, शारंगधर महिला अर्बन मेहकरच्या अध्यक्षा सौ. रंजनाताई रायमुलकर, विश्वकर्मा महिला अर्बन बुलढाणाच्या अध्यक्षा सौ. अलकाताई सुरोशे, प्रा. पुरुषोत्तम आकोटकर, प्रा. मनोज मुरेकर, प्रा. विजय रायमल, बबनराव इंगळे तसेच अमोल भोलनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केले.
कार्यक्रमात जानेफळ येथील कु. ऋतिका ज्ञानेश्वर इंगळे हिने लोकप्रिय मराठी गीतावर सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. तिच्या उत्कृष्ट नृत्यकलेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व सूत्रसंचालन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. समाजातील एकोपा, गुणवंतांचा गौरव आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

إرسال تعليق