महिला बचत गटांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी 'सारथी आठवडी बाजार'; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खामगाव : दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत नगरपरिषद खामगावच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या उद्योगांना चालना मिळावी तसेच त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नगरपरिषदेतर्फे स्वखर्चाने 'सारथी आठवडी बाजार' सुरू करण्यात आला आहे.

दिनांक 20 एप्रिल 2026 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे हा आठवडी बाजार नियोजित वेळेनुसार नियमित भरविण्यात येत असून, शहरातील नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेले विविध दर्जेदार व घरगुती उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असून, ग्राहकांकडून त्यांना चांगली पसंती मिळत आहे.

या आठवडी बाजारात पापड, लोणची, मसाले, घरगुती खाद्यपदार्थ तसेच हंगामानुसार विविध उपयोगी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांनी या वस्तूंची खरेदी करून महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला बळ द्यावे व त्यांच्या उद्योगवृद्धीस हातभार लावावा, असे आवाहन नगरपरिषद खामगावच्या वतीने करण्यात आले आहे.

महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून, नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी ठरत असल्याचे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post