खामगावात नॉनव्हेज मसाल्यासाठी 'ओला गोळा'ची वाढती क्रेझ; अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह ;पौष्टिकतेचे दावे, मात्र गुणवत्तेची तपासणी कोण करणार? प्रशासनाच्या हस्तक्षेपाची गरज !

खामगाव : शहरात नॉनव्हेज पदार्थांना अधिक चवदार बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'ओला गोळा' मसाल्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी हा मसाला तयार करून विक्री केली जात असून, उत्पादकांकडून तो पौष्टिक व दर्जेदार असल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र या उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता, वापरले जाणारे घटक आणि अन्नसुरक्षेच्या निकषांची पूर्तता होते का, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या या ओल्या मसाल्याचे उत्पादन कोणत्या मानकांनुसार केले जाते, त्याची प्रयोगशाळेत तपासणी होते का, तसेच तो आरोग्यास अपायकारक तर नाही ना, याची खातरजमा होणे आवश्यक असल्याचे मत सुज्ञ नागरिक व्यक्त होत आहे. कोणतीही अधिकृत तपासणी न झाल्यास ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टीप: या बातमीत मांडलेले आरोग्यविषयक प्रश्न हे सार्वजनिक चिंतेच्या स्वरूपात आहेत. 

Post a Comment

أحدث أقدم