खामगाव. _ राज्य शासनाने कर्जमाफीची पहिली लाभार्थी यादी जाहीर केली असली तरी खामगाव तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाल्यानंतरही कर्जमाफीची प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळाले नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेऊन शेती करावी लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
याशिवाय अनेक राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती आणि सहकारी बँकांकडून सिबिल (CIBIL) स्कोअर, वन टाईम सेटलमेंट (OTS)तसेच इतर तांत्रिक कारणे पुढे करून पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शासनाने कर्जमाफीची घोषणा करूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याने शासनाच्या निर्णयाचा उद्देशच फोल ठरत असल्याची टीका **राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खामगाव तालुकाध्यक्ष संजय बगाडे** यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना उपविभागीय अधिकारी, खामगाव यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.या निवेदनात खामगाव तालुक्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची तातडीने फेरतपासणी करून पुढील याद्यांमध्ये समावेश करावा, उर्वरित लाभार्थी याद्या तातडीने जाहीर कराव्यात, कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पात्र शेतकऱ्याला पीककर्ज नाकारू नये, तसेच CIBIL व OTSया कारणांवरून पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पेरणीसाठी सावकारांकडून कर्ज घेण्यास भाग पडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बँकांकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे आणि कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफी व पीककर्जापासून वंचित राहणार नाही, यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment