निरंकारी मिशनच्या हरित महाअभियानाच्या सहाव्या टप्प्यात शेगांव मध्ये रोपांची लागवड
शेगांव(प्रतिनिधी): संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या अभियानाच्या सहाव्या टप्प्याचे आयोजन शेगांव येथे उप अधीक्षक भूमी अभिलेख या कार्यलयामध्ये ए. डी. देशमुख उप अधीक्षक भू. अ. यांचे हस्ते व विश्वंभर राऊत प्रतिष्ठित नागरिक यांचे उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच महादेव वानरे, विश्वानाथ आघाव रमेश पानझाडे इत्यादी वयोवृद्ध मिशनच्या जेष्ठ प्रचारकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता, सदर वृक्षारोपण हे शिवचरण गाडगे सेवादल संचालक यांचे मार्गदर्शन मध्ये करण्यात आले. आज देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील ६५० ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात मिशनचे लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवक यांनी पूर्ण समर्पित भावनेने सहभाग घेत सुमारे ५.५ लाख रोपांची लागवड केली.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या या महाअभियानाला बाबा हरदेव सिंह जी यांच्या दिव्य संदेशाची प्रेरणा आहे — ‘प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहे.’ हा संदेश केवळ पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करणारा नसून, मानवी चेतना निर्मळ करण्यास तसेच निसर्गाप्रती जबाबदार बनण्यास प्रेरणा देणारा आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा जी यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत ६५० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादार पूर्ण समर्पित भावनेने या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन मिशन करीत आहेत.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे मिशन केवळ रोपांची लागवड करण्यापुरती आपली जबाबदारी मर्यादित ठेवत नाही, तर ही रोपे मोठी होऊन वृक्ष बनेपर्यंत त्यांचे सातत्याने संरक्षण करण्याचा संकल्पही पूर्ण करते. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षांपर्यंत नियमित देखभाल केली जाते, जेणेकरून त्यांची योग्य वाढ होऊन ते घनदाट लघुवनांचे स्वरूप धारण करतील, जैवविविधता समृद्ध करतील, स्थानिक परिसंस्थेला बळकटी देतील आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व हिरवेगार वातावरण उपलब्ध करून देतील.

Post a Comment