२६ खामगाव विधानसभा मतदारसंघात SIR प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण
२,७५,५३३ मतदारांचे गणना प्रपत्र डिजिटायझेशन पूर्ण; १८,४४८ मतदारांची गणना प्रपत्रे प्राप्त नाहीत
*खामगाव, दि. २४ ऑगस्ट :* मा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील मतदार याद्यांची विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया (SIR) दि. २९ जून २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या प्रक्रियेचा पहिला टप्पा दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण झाला आहे.
२६ खामगाव विधानसभा मतदारसंघात एकूण २,९३,९८१ मतदार असून, त्यापैकी २,७५,५३३ मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त करून, स्वाक्षरीसह डिजिटायझेशनची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तर १८,४४८ मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झालेले नाही.
SIR प्रक्रियेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन गणना प्रपत्र प्राप्त करून घेणे, त्यावर स्वाक्षरी घेणे तसेच प्राप्त प्रपत्रांचे डिजिटायझेशन करण्याची कार्यवाही केली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, BLO, पर्यवेक्षक तसेच इतर प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांची यंत्रणा कार्यरत होती.
गणना प्रपत्र प्राप्त न झालेल्या १८,४४८ मतदारांमध्ये मयत मतदार ४,९७९, स्थलांतरित ९,८६४, दुबार नोंदणी २,३९८, अनुपस्थित १,१९१ आणि इतर कारणांमुळे १६ मतदारांचा समावेश आहे.
गणना प्रपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांची यादी संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (BLA) यांना उपलब्ध करून देण्यात आली. तसेच या संदर्भात दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आवश्यक बैठका घेऊन त्यांचे इतिवृत्त BLO ॲपवर अपलोड करण्यात आले आहे.
दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार
SIR प्रक्रियेनंतर दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रक्रियेनुसार ३,७३९ मतदारांना तसेच विसंगती असलेल्या (Anomaly voters) ६,१७० मतदारांना नोटीस बजावण्यात येणार आहे. संबंधित मतदारांनी नोटीसमध्ये नमूद केलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासमोर सुनावणीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तसेच दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर पात्र ठरणाऱ्या १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची नवीन मतदार म्हणून नोंदणी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच सन २००२ च्या मतदार यादीतील नोंदणीबाबत उपलब्ध असलेली आवश्यक माहिती व पुरावे संबंधित BLO यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले आहे.
मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे, असेही त्यांनी कळविले आहे.

Post a Comment