खामगाव : अग्रवाल महिला मंडळ व बंधू मंडळ, खामगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथा महोत्सवाला अग्रवाल समाजातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३ ऑगस्ट ते १० ऑगस्टदरम्यान अग्रसेन भवन, खामगाव येथे आयोजित या सात दिवसीय धार्मिक सोहळ्याची भक्तिमय वातावरणात यशस्वी सांगता झाली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक मनीष कृष्णजी महाराज यांच्या मधुर व ओघवत्या वाणीतून भाविकांनी श्री शिव महापुराणाचे श्रवण केले. या कालावधीत भगवान शिवाचे महात्म्य, सती-शिव चरित्र, नारदजींची कथा, शिव-पार्वती विवाह, श्री गणेश जन्मोत्सव, स्वामी कार्तिकेय यांची कथा तसेच भगवान शिवाच्या दिव्य लीलांचे सुंदर आणि भावपूर्ण वर्णन करण्यात आले.
या सातही दिवसांत अग्रवाल समाजातील अनेक कुटुंबांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने कथेत सहभाग घेतला. दररोज मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजबांधवांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला. या धार्मिक आयोजनामुळे समाजामध्ये भक्ती, संस्कार, एकात्मता आणि सनातन संस्कृतीची भावना अधिक दृढ झाली.
कथेच्या अंतिम दिवशी सामूहिक हवन, पूर्णाहुती व महाप्रसादीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला आणि भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद प्राप्त केले.या संपूर्ण आयोजनाला समाजातील नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्य यामुळे श्री शिव महापुराण कथा महोत्सव हा अग्रवाल समाजासाठी एक अविस्मरणीय व आध्यात्मिक अनुभव ठरला.
आयोजक अग्रवाल महिला मंडळ व बंधू मंडळ, खामगाव यांनी कथावाचक मनीष कृष्णजी महाराज, सर्व भाविक, समाजबांधव, सेवाभावी कार्यकर्ते व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा भव्य धार्मिक सोहळा अत्यंत यशस्वीपणे पार पडला.




Post a Comment