राष्ट्रपुरुषांचे विचार मनात रुजवा : डॉ. रामपाल धारकर
पिंपळगाव राजा(जनोपचार न्यूज नेटवर्क): राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करताना केवळ त्यांचे स्मरण न करता त्यांचे विचार मनात रुजविणे ही काळाची गरज आहे. युवकांनी राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात पुढे यावे तसेच व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन प्रबोधनकार डॉ. रामपाल धारकर यांनी केले.
तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे २९ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित प्रबोधन कार्यक्रमात डॉ. रामपाल धारकर बोलत होते. कार्यक्रमाला प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, पत्रकार लुकमान परवाज, अमरावती येथील अनिल देशमुख आणि ह.भ.प. प्रल्हाद सातव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. थारकर म्हणाले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित व वंचित समाजघटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांनी वंचितांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविला. अहोरात्र लोकहितासाठी कार्य करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असून ते आत्मसात करून सामाजिक परिवर्तनासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमात हार्मोनियम वादक सुनील गाईनकर, तबलावादक पंकज मिसाळे, तसेच साथसंगतकार पवन कदम व सारथी सुखदेव चिंचोळकर यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे संचालन प्रा. संजय पाटोळे व प्रदीप वानखडे यांनी केले. अध्यक्ष पवन पाटोळे , उपाध्यक्ष सूरज वानखडे, कार्याध्यक्ष सहदेव चंदनशिव, कोषाध्यक्ष दिलीप पाटोळे, सल्लागार संतोष पाटोळे आणि सचिव फकीरा कांबळे यांच्यासह वीर लहुजी नवयुवक सांस्कृतिक क्रीडा मंडळ व समस्त मातंग समाज बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला समाजबांधवांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment