बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीला राजकीय रंग चढला असून, एकूण २१ संचालक जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आतापर्यंत तीन जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यानंतर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर यांचीही मंगळवारी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे २१ पैकी तीन जागांवरील निवड बिनविरोध झाली असून उर्वरित १८ जागांसाठी निवडणुकीची रंगत कायम आहे.

उर्वरित जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून, उपलब्ध माहितीनुसार १८ जागांसाठी तब्बल २३१ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, देऊळगाव राजा, लोणार, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या ११ तालुक्यांतील कृषी पतपुरवठा मतदारसंघांचा यात समावेश आहे. याशिवाय कृषी प्रक्रिया व पणन, नागरी बँका व पतसंस्था, इतर सहकारी संस्था, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच भटक्या-विमुक्त प्रवर्गातील जागांचाही समावेश आहे.

निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक राजकीय दिग्गज व त्यांच्या समर्थकांचे उमेदवारी अर्ज असल्याने राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. संजय गायकवाड, श्वेता महाले, चैनसुख संचेती, विजय राज शिंदे, संजय रायमुलकर, धृतराव सावळे, राजेश एकडे, तोताराम कायंदे, प्रकाश पाटील, प्रसन्नजीत पाटील, जालिंदर बुधवत, नरेंद्र खेडेकर यांच्यासह अनेक उमेदवार मैदानात आहेत. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उर्वरित १८ जागांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

أحدث أقدم