हिंगोली : “तुम्ही माझे लग्न का करून देत नाहीत?” या कारणावरून आजी व मावशीची कुऱ्हाड व काठीने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी रोहीदास नंदुलाल चहाटे (वय ३१, रा. पुसेगाव, ता. सेनगाव) याला मा. जिल्हा न्यायाधीश-१, हिंगोली श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांनी दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही हत्यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी ची शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकत्रितरित्या भोगण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
ही घटना २० मार्च २०२१ रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास मौजे पुसेगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४३५ येथे घडली होती. फिर्यादी दशरथ किसन पहारे यांच्या आखाड्यावर आरोपी रोहीदास चहाटे याने लग्न करून देत नसल्याच्या कारणावरून त्याची आजी देवकाबाई किसन पहारे (वय ८५) व मावशी मंगलाबाई उत्तम बशिरे (वय ४५) यांना कुऱ्हाड व काठीने डोक्यात व पाठीवर गंभीर मारहाण करून ठार केले. तसेच आरोपीची आई अनुसयाबाई नंदुलाल चहाटे (वय ६५) यांनाही मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८/२०२१, कलम ३०२, ३२४ व ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. गिरी यांनी सखोलपणे करून दोषारोपपत्र हिंगोली जिल्हा न्यायालयात सत्र खटला क्रमांक ५२/२०२१ अन्वये दाखल केले. न्यायालयाने आरोपीस दोन्ही खुनांच्या कलम ३०२ अंतर्गत दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, तसेच जखमी अनुसयाबाई यांच्यावर केलेल्या मारहाणीप्रकरणी कलम ३२४ अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली.
तसेच मयत देवकाबाई किसन पहारे यांचे कायदेशीर वारस दशरथ किसन पहारे, मयत मंगलाबाई उत्तम बशिरे यांचे कायदेशीर वारस तसेच जखमी अनुसयाबाई नंदलाल चहाटे यांना नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई देण्याचे निर्देश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांना देण्यात आले आहेत. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. न्यायालयासमोर एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांना सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे व ॲड. सविता एस. देशमुख-जाधव यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्योती खिल्लारे, पोलीस ठाणे नर्सी नामदेव यांनी केली.

Post a Comment