*पाणीपुरवठा व्यवस्थेची नगराध्यक्षा सौ. फुंडकर यांनी केली ‘ऑन द स्पॉट’ पाहणी!

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही” - सौ. अपर्णा सागर फुंडकर*



*जळका भडंग, आवार फिल्ट्रेशन प्लांट व शिर्ला नेमाने धरण येथे कर्मचार्‍यांना कोणताही पूर्वसूचना न देता भेट; स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश*

*खामगाव :* गेल्या काही दिवसांपासून खामगाव शहरातील विविध भागांत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारींची दखल घेत, नगराध्यक्षा *सौ. अपर्णा सागर फुंडकर* यांनी आज कोणतीही पूर्वसूचना न देता जळका भडंग, आवार फिल्ट्रेशन प्लांट तसेच शिर्ला नेमाने धरण येथे भेट देत पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.


शहरातील पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करून परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यासाठी यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने आज नगराध्यक्षा सौ. फुंडकर यांनी स्वतः संबंधित ठिकाणी भेट देऊन जलस्रोत, फिल्ट्रेशन प्लांट तसेच पाणी शुद्धीकरण व्यवस्थेचा आढावा घेतला.


यावेळी शिर्ला नेमाने धरणातील पाणीसाठा व पाणीपातळीची स्थिती, तसेच जळका भडंग व आवार येथील वॉटर फिल्ट्रेशन प्लांटची कार्यप्रणाली याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेतील विविध टप्पे, वापरात असलेली यंत्रसामग्री आणि सद्यस्थितीतील कार्यपद्धतीचीही पाहणी त्यांनी केली.


नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे हे नगरपरिषदेचे प्राधान्य असून, त्यासाठी सध्याच्या व्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करण्यासोबतच अद्ययावत तंत्रज्ञान, आधुनिक उपकरणे व अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना नगराध्यक्षा सौ. फुंडकर यांनी दिल्या. फिल्ट्रेशन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविणे आणि पाण्याच्या गुणवत्तेवर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


फिल्ट्रेशन प्लांट परिसरातील स्वच्छता, पर्यावरणीय परिस्थिती आणि संपूर्ण परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.




*नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही” - सौ. अपर्णा सागर फुंडकर*

नगराध्यक्षा म्हणाल्या, “खामगाव शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित, स्वच्छ पाणी मिळणे ही नगरपरिषदेची प्राथमिकता आहे. पाणीपुरवठ्याबाबत आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज प्रत्यक्ष उपरोक्त ठिकाणी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या विषयात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.” असेही त्या यावेळी म्हणाल्या.

नगराध्यक्षांच्या या अचानक पाहणीमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबतच्या कार्यवाहीला अधिक गती मिळणार आहे.

याप्रसंगी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post