बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
खामगावात काँग्रेसचे आंदोलन ः शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
खामगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क) पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी आज दि.४ सप्टेंबर रोजी किसान काँग्रेस व खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी वाळलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या हातात घेऊन कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी एसडीओ डॉ.रामेश्वर पुरी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमुद आहे की, बुलडाणा जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील सोयाबीन, तूर तसेच इतर सर्व पिके सुकत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे काही शेतकरी बांधवांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बुलडाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी जाहीर झालेली असली तरी विविध निकषांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे सर्व थकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, शेतातील पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होण्यासाठी विद्युत पुरवठा दिवसभर व नियमित स्वरूपात करण्यात यावा, नादुरुस्त विद्युत डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) विनाविलंब दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा, पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिह चौहाण, शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, कार्याध्यक्ष किशोरआप्पा भोसले, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश इंगळे, किसान काँग्रेस कार्याध्यक्ष कैलास साबे, काँग्रेस ओबीसी सेलचे नेते कैलास फाटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अचलेश्वर दिपके, जिल्हा संघटन सचिव अतुल सिरसाट, सचिन जयस्वाल, मनोज बोदडे, गजानन हागे, राजकुमार शेगोकार, ॲड.अशोक इंगळे, सुभाष वावगे, गणेश वाशिमकर, अनिल टेके, सचिन देशमुख, मंगेश भारसकाळे, प्रमोद चिंचोळकार, अमोल वावगे, प्रविण मेहसने, छोटुसिंग राजपूत, गोपाळ चव्हाण, शिवदास घ्यार, ज्ञानदेव कोरे, हरिभाऊ उगले, सहदेव वासनकार, महादेव कळसकार, गजानन रहित, समाधान वासनकार, बळीराम वासनकार, श्रीकृष्ण धानोरे, गजानन तायडे, मोहम्मद वसीमोद्दीन, काजी अमिर, गजानन हिंगणे, गुलाबराव निंबाळकर, पांडुरंग राखोंडे, विकास घ्यार, संभाजी घ्यार, अजय पवार, शिवदास पारसकर, शिवशंकर वाशिमकर, नितीने डोंगे, अमोल डोंगे, अविनाश इंगळे, कैलास वासनकार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुकलेल्या पेंढ्या आणि अश्रृधारा...!
एसडीओ डॉ.रामेश्वर पुरी यांच्या सोबत चर्चा करताना शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील वाळलेल्या पिकांच्या पेंढ्या दाखवत व्यथा मांडल्या. आधीच कर्जबाजारी असताना उसनवारीने पैसे घेवून शेतकऱ्यांनी यंदाचा हंगामातून काहीतरी हाती पडले या आशेने पेरणी केली होती. मात्र निसर्गाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून व्यथा मांडताना शेतकऱ्यांना डोळ्यातून अश्रृंचा बांध फुटला.
--------------------------------------------

Post a Comment