७ सप्टेंबरला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी द्यावी

श्री नवयुवक मानाची कावड यात्रा, खामगाव शहरच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन



खामगाव – हिंदू धर्मियांचा पवित्र श्रावण महिना सुरू असून, श्रावणातील शेवटच्या सोमवारी खामगाव शहरात श्री नवयुवक मानाची कावड यात्रेसह सुमारे २५ ते २८ कावडधारी मंडळांच्या वतीने कावड यात्रा काढण्यात येणार आहे. विविध तीर्थक्षेत्रांवरून पवित्र जल आणून भगवान श्री महादेवांचा जलाभिषेक करण्यात येतो. ही कावड यात्रा सकाळी ७ वाजता सुटाळा येथून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ७ सप्टेंबर रोजी खामगाव शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत श्री नवयुवक मानाची कावड यात्रा, खामगाव शहरच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकर यांच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती खामगाव यांना निवेदन देण्यात आले. गो.से. महाविद्यालय ते शहर पोलीस स्टेशनदरम्यान कावडधारी मंडळांच्या सहभागामुळे मोठी गर्दी, ढोल-ताशांचा गजर तसेच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या मार्गावर शाळा व महाविद्यालये असून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसू शकतो. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून ७ सप्टेंबर रोजी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून, शहरातील कावडधारी मंडळांच्या अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्याही निवेदनावर आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post