​खामगाव येथे ३० सप्टेंबरला शिवसेनेचा भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’; आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात धडकणार

​खामगाव : पावसाच्या दीर्घ खंडामुळे तालुक्यातील सोयाबीनसह इतर मुख्य पिके हातातून गेली असून कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. १ रुपयांच्या विमा योजनेतील त्रुटींमुळे बहुतांश शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत, तर वीज महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे सिंचन करणेही कठीण झाले आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या या तीव्र समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खामगाव येथे 'भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा' चे आयोजन करण्यात आले आहे.

​हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (नगर परिषद मैदान) येथून निघून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार असून त्यांना निवेदन देण्यात येणार आह. आमदार नितीनबापू देशमुख यांच्या नेतृत्वात आणि बुलढाणा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला विदर्भ संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत, शिवसेनेचे उपनेते जालींदर बुधवत, आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा प्रमुख महिला आघाडी सौ. जयश्रीताई शेळके, किसान सेना जिल्हाप्रमुख गजानन बिलेवार, सहसंपर्क प्रमुख सौ. चंदाताई बढे, उर्मिलाताई ठाकरे, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, जिल्हाप्रमुख गजाननराव वाघ, वसंतराव भोजने, शुभम पाटील, भिकुलाल जैन, दत्तात्रय पाटील, विजय बोदडे आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या,पीक विम्याचा मोबदला तातडीने अदा करण्यात यावा,शेतीसाठी पूर्ण क्षमतेने व सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा,विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी, कर्जमाफीच्या उर्वरित याद्या तात्काळ जाहीर कराव्यात, महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवून वीज बिल देयक कमी करावे, पशुधनासाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात, ‘पीएम किसान’ सन्मान निधीची रक्कम वाढवण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे अनुदान मिळावे अशा मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व घामाच्या पिकाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, नागरिक व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खामगाव तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात



Post a Comment

أحدث أقدم