दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गुजंकर एज्युकेशन हबचा मदतीचा हात
*मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजारांचा सहयोग; सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांची परंपरा कायम*
खामगाव : राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामावर परिणाम होऊन शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत गुजंकर एज्युकेशन हब, खामगावच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपयांचा सहयोग निधी देण्यात आला. २८ सप्टेंबर रोजी धनादेशाद्वारे हा निधी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. रामकृष्ण गुजंकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आपत्तीच्या काळात गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची संस्थेची परंपरा आहे. यापूर्वी केरळमध्ये आलेल्या महापुराच्या काळातही संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत केली होती. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना आधार देण्याचे काम संस्थेकडून सुरू आहे. आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून नर्सरीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी दत्तक घेतले जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलत दिली जाते. तसेच आर्मी, सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ आणि बीएसएफमध्ये देशसेवा करणाऱ्या शहीद जवानांच्या पाल्यांनाही ५० टक्के शैक्षणिक सवलत देण्यात येते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठीही संस्थेने ५० टक्के सवलतीची सुविधा सुरू ठेवली आहे. त्यासोबतच सातपुडा पर्वतरांगांतील आदिवासी भागातील गरजू कुटुंबांसाठी गेल्या १५ वर्षांपासून दिवाळीनिमित्त कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात येते. आर्थिक अडचणीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यापासून ते आपत्तीग्रस्तांना मदत करण्यापर्यंत संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला ५१ हजारांचा सहयोग निधीही याच सामाजिक कार्याच्या वाटचालीतील महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने कळविण्यात येत आहे
![]() |
| जाहिरात |


إرسال تعليق