शिवसेना महिला आघाडी व बचत गटांच्या महिलांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

खामगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या महिला बचत गटांची सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी, खामगाव तालुका तसेच नागापूरसह खामगाव तालुक्यातील विविध बचत गटांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Advt.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह बुलढाणा जिल्हा व खामगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत महिला बचत गटांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, काही बँका आणि खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून बचत गटांच्या महिलांकडे जाऊन सक्तीने तसेच दमदाटी करून कर्जवसुली केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या संबंधित आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिला बचत गटांची सर्व प्रकारची कर्जवसुली तात्काळ थांबवावी, सक्तीने वसुली करणाऱ्या बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि दुष्काळविषयक शासनाच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, प्रहार संपर्कप्रमुख गजानन लोखंडकार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, खामगाव शहरप्रमुख चेतन ठोंबरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री देशमुख, शिवसेना उपशहरप्रमुख भाऊ बिडकर यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم