..हा तर सानंदांचा शरणागती सोहळा !

खामगाव-प्रवाहाच्या बरोबर बाहवत जाणे सोपे असते; पण प्रवाहाच्या विरोधात उभे ठाकायला हिंमत लागते. अशी हिंमत करणाराच काळाच्या ओघात यश प्राप्त करत असतो मग ते क्षेत्र कोणतेही असो. पक्षांतराच्या माध्यमातून सत्तेचा सोपान चढू पाहणाऱ्या माजी आमदार दिलीपकुमार सानंदांनी हा मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. सानंदा यांच्याच सांगण्यानुसार भा.रा. काँग्रेसमध्ये ते मागील ४० वर्षापासून कार्यरत असून त्यांना पक्षाने खुप काही दिले आहे. खरे तर आमदारकीसह विविध पदे त्यांनी यथेच्छ उपभोगली. पण मागील १०-११ वर्षांमध्ये विरोधी पक्षात बसावे लागल्याने जणू 'पाण्याविना मासा तडफडे' अशी त्यांची गत झाली होती. सतत आपले डफडे वाजविणे व अधिकाऱ्यांवर रुबाब गाजविणे याची सवय झालेल्या सानंदांना सत्तेविन चैन पडत नव्हती. शिवाय कुटुंबियांचे दारुचे धंदे, अमाप संपत्ती बामुळे इंडी, आयकर, किंवा उत्पादन शुल्क विभागाची कारवाई तर होणार नाही ना? याचीही भीती त्यांना वाटत असावी. कारण काही का असेना, पण सानंदांनी 'जबतक जिंदा हूँ, काँग्रेस का परिंदा हूँ या आपल्याच शब्दाला न जागता स्वहिता करीता काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील त्यांच्या प्रवेशाचा सोहळा उद्या होवू घातलेला आहे. या प्रवेश सोहळ्याची ज्या पध्दतीने पोस्टरबाजी, जाहिरातबाजी करुन ढोल बडविण्याचे काम सानंदांकडून सुरु आहे ती पाहता सुज्ञ नागरिकांची मती गुंग झाली आहे. कारण हा प्रवेश सोहळा म्हणजे खरे तर सानंदांचा शरणागती सोहळा आहे. ज्या भाजप-शिवसेनेच्या विरोधात लढण्यात सानंदांची हयात गेली त्यांच्याच ऑजळीने पाणी पिण्याचे काम आता सानंदा करणार आहेत, ज्या आकाश फुंडकरांकडून दोनदा विधानसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्ला त्याच फुंडकरांसाठी सानंदा २०२९ मध्ये मते मागणार आहेत. सानंदांसाठी ही केवढी लाजीरवाणी गोष्ट आहे. केवढी मोठी तडजोड सानंदांनी सत्तेसाठी केली. भाजपाचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्यापासून सानंदांनी काही तरी शिकायला पाहिजे होते. भाऊसाहेबांचे संपूर्ण जीवन विरोधी पक्षात राहुन सत्ताधिशांशी लढण्यात गेले पण त्यांनी कधीही पक्षनिष्ठा ढळू दिली नाही. सानंदांनी मात्र ११ वर्षातच पक्षनिष्ठा गुंडाळून ठेचली. आता आपण काँग्रेस सोडलीच नाही, राष्ट्रवादीची विचारधारा तीच आहे वगैरे कितीही बालिशपणाच्या बाता सानंदा मारत असले तरी त्याला काही अर्थ नाही.

सानंदा सत्तेसाठी महायुतीला शरण गेले आहेत व त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळा हा शरणागती सोहळा आहे यात कुठलीच शंका नाही. सानंदांनी काँग्रेस सोडल्याने भाजपला कदाचित फायदाच होईल पण भाजप-सेनेच्या कार्यकत्यांना महायुतीमध्ये सानंदांच्या सोबत बसणे नैतिकतेच्या आधारावर मान्य होताना दिसत नाही. याबाबतची उघड नाराजी भाजप-सेनेचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवरच्या निवडणूकीत भाजप-सेना, राष्ट्रवादीसोबत युती करेल याची सुतराम शक्यता नाही. परिणामी सानंदा महायुतीमध्ये एकाकी पडण्याचीच अधिक शक्यता आहे. ना. आकाश फुंडकर हे सध्यातरी या मुद्यावर मौन बाळगून महायुतीचा धर्म पाळत असले तरी त्यांना आपल्या कार्यकत्यांची भावना समजून घेवूनच पुढील नियोजन करावे लागेल. यात सानंदांच्या पदरात काय पडते? ते येणारा काळच सांगेल.

                                                     साभार - सांज दैनिक प्रश्नकाल 

Post a Comment

Previous Post Next Post