पत्रकारांनी मूल्यनिष्ठता, जबाबदारी आणि मानवी दृष्टिकोन जपणे आवश्यक

डिजिटल युगातील पत्रकारिता आव्हाने, संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा यावर बुलढाणा जिल्हास्तर मीडिया चर्चासत्र संपन्न


खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:  डिजिटल तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या बदलांचा आढावा घेताना पत्रकारांनी मूल्यनिष्ठता, जबाबदारी आणि मानवी दृष्टिकोन जपणे आवश्यक आहे, असा सूर ३ ऑगस्ट रोजी खामगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय मीडिया संमेलनात उमटला. ‘डिजिटल तंत्रज्ञान : आव्हाने, संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा’ या विषयावर ब्रह्माकुमारीज मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांच्यावतीने रायगड कॉलनी येथील ब्रह्माकुमारीज शिवालय सेवाकेंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू स्मृती आणि कुमारी देविका कापडे हिच्या  'स्वागतम शत स्वागतम'  या स्वागत नृत्याने झाली. यानंतर ब्रह्माकुमारी शकुंतलादीदी यांनी स्वागत संबोधन केले.
विषयाची प्रास्तावना ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी केली. त्यात त्यांनी म्हटले की, सूचना दिल्याने समस्या सुटत नाही आणि समाधान होत नाही म्हणून समस्याप्रधान  समाधानयुक्त पत्रकारिता करणे महत्वाचे आहे. मीडियाच्या कर्तव्याबाबतीत गांधीजी म्हणाले होते की, 'पत्रकारिता म्हणजे फक्त सेवा, सेवा आणि सेवा होय'. पोलीस व प्रशासन नसताना कही दिवस देश चालणे शक्य होईल परंतु मिडिया शिवाय एकही दिवस देश चालणे शक्य नाही.  त्याचबरोबर त्यांनी ब्रह्माकुमारी मीडिया विंगद्वारा होत असलेल्या मूल्यनिष्ठ कार्यक्रमांचा आढावा घेतला.
बीज भाषणात ज्येष्ठ संपादक  राजेश राजोरे यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेतील आव्हानांवर प्रकाश टाकत ‘वेगवान बातम्या देताना अचूकता आणि जबाबदारी अबाधित ठेवणे तसेच सोशल मीडियावर नियंत्रण आजचे मोठे आव्हान आहे', तंत्रज्ञानासोबत पत्रकारांनी आत्मपरीक्षण आणि नैतिकतेचे भान ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभ दीपप्रज्वलनाने झाला. उद्घाटकीय संबोधनात  रणजीतसिंह राजपूत, अध्यक्ष, अ.भा. मराठी पत्रकार संघ, बुलढाणा जिल्हा यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजास नवीन दिशा देण्याचे कार्य होते, अभिव्यक्तीचे रक्षण करणे पत्रकारितेचे काम आहे. जी व्यवस्था अर्थात प्रशासन आम्हास नियंत्रीत करते त्यातच गडबड आहे. खरी पत्रकारिता करणार्‍यांचे रक्षण व्हावे, असे प्रतिपादन केले.
अरुण जैन, वरीष्ठ उपसंपादक, दै. सकाळ, बुलढाणा विभाग, यांनी अशा चर्चासत्रातून ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागाद्वारे वैचारिक क्रांती आणण्याचे काम होत आहे असे म्हटले. अनिल गवई, उपसंपादक, दै. लोकमत, खामगाव यांनी  आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ति प्रेरणा ब्रह्माकुमारीज्च्या अशा चर्चासत्रातून निश्चित मिळेल, असे प्रतिपादन केले. संदिप वानखेडे (पुढारी न्यूज चॅनल) यांनी सांगितले की, सकारात्मक पत्रकारिता लोप पावत चालली आहे. डिजिटल पत्रकारितेतील ब्रेकिंग न्यूज मागे धावतांना अन्याय होतो,  त्याबातीत काळजी घेणे आवश्यक आहे.राजेंद्र काळे, जिल्हा प्रतिनिधी, देशोन्नती, बुलढाणा यांनी आपल्या मनोगात म्हटले की, ब्रह्माकुमारीज् ही विश्वशांतीची भूमिका निभावते, ब्रह्माकुमारीज व पत्रकारिता यांच्यात मैत्री आहे, आज जागतिक मैत्री दिवसानिमित्त अशा चर्चासत्रांचे आयोजन या दोघांमध्ये मैत्री दृढ करणारे आहे,  ही समाधानाची बाब आहे.
समारोपपूर्वी राजयोगीनी ब्रह्माकुमारी रुख्मिणीदीदी, संचालिका, अकोला सेवाकेंद्र यांनी आशिर्वचन दिले तर बी.के. सुषमादीदी यांनी राजयोग अभ्यासाचे मार्गदर्शन केले. सहभागी मीडिया प्रतिनिधी म्हणून खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आप्पा भोसले, प्रेस क्लब खामगाव अध्यक्ष प्रशांत देशमुख, पत्रकार गजानन राऊत, पत्रकार सूर्यवंशी, पत्रकार धनंजय वाजपे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी सुषमादीदी यांनी केले. आभार प्रा. गोपाल राखोंडे यांनी मानले. समारोप प्रभू स्मृतीने करण्यात आला. या प्रसंगी बुलढाणा जिल्हयातून मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला

Post a Comment

Previous Post Next Post