प्रभाग क्रमांक ४ मध्ये मयूर हुरसाड पोहोचले "डोअर टू डोअर"
नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना प्रभाग क्रमांक ४ मधील युवा उमेदवार मयूर हुरसाड आणि वर्षा इंगोले यांनी आपल्या प्रचाराला मोठी गती दिली आहे.दोन्ही उमेदवारांनी घेऊन चाललेल्या विकासाभिमुख भूमिकेला आणि जनसंपर्काला मतदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागातील सिंथी कॉलनी, भिसे प्लॉट आणि सिव्हिल लाइन भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. सकाळपासूनच सुरू झालेल्या या फेरीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत परिसर गाजवला. ढोल-ताशांच्या निनादात, काही हात जोडून मतदारांना अभिवादन करत उमेदवारांनी डोअर टू डोअर जाऊन जनसंपर्क साधला. मयूर हुरसाड हे युवा चेहरा म्हणून प्रभागात लोकप्रिय असून त्यांनी आतापर्यंत युवकांसाठी रोजगारनिर्मिती, क्रीडा सुविधा, मूलभूत सोयींच्या उभारणीवर भर देणारे आपले दृष्टीकोन मतदारांसमोर मांडले आहेत. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी या फेरीदरम्यान मतदारांना दिले. तसेच, प्रभागातील महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या वर्षा इंगोले यांचा प्रचारही जोरदार सुरू आहे. महिला मतदारांमध्ये त्यांना मोठी पसंती मिळत असून महिलांच्या सुरक्षेसह रोजगारवृद्धी, स्व-सहायता गटांच्या बळकटीकरणासारख्या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांचा आत्मीयतेने केलेला संवाद आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे आश्वासन मतदारांना भावत आहे. आजची प्रचार फेरी हा प्रभागातील निवडणुकीच्या वातावरणातील आणखी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे. उमेदवारांच्या या संयुक्त आणि उत्साहपूर्ण प्रचारामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील निवडणूक अधिक रंगतदार झाली असून स्थानिक पातळीवर चर्चा, मतदारांची गर्दी व वाढता उत्साह यातून निवडणुकीचा जोर स्पष्टपणे जाणवत आहे. प्रभागातील दोन्ही युवा उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता येथील स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून मतदार कोणाला पसंती देतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment