शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक अर्थसंकल्प -काँग्रेस नेते धनंजय देशमुख

जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या विशेषतः सोयाबीन व कापूस उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेते धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

या अर्थसंकल्पामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस उपाययोजना जाहीर करण्यात आलेली नाही. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठीही कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे, असे त्यांनी नमूद केले.

या उलट खनिजे, भंगार, अल्कोहोल तसेच फ्युचर्स ट्रेडिंगवरील दर वाढवण्यात आले असून, परदेशी प्रवासावरील कर मात्र कमी करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना परदेशी प्रवास करण्याची वेळ येत नसताना हा निर्णय केवळ श्रीमंत वर्गासाठीच असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. त्यामुळे सामान्य जनतेसाठी या अर्थसंकल्पात काहीही ठोस दिलासा नसल्याचे स्पष्ट होते.

पर्यटन क्षेत्राबाबत अर्थसंकल्पात विविध राज्यांमध्ये ट्रेकिंग, हायकिंग, कासव ट्रेल्स, पक्षीनिरीक्षण ट्रेल्स व शाश्वत पर्वतीय पर्यटन विकासाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे असतानाही राज्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.

देशातील १५ पुरातत्त्वीय स्थळांच्या विकासाची घोषणा करूनही महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न आल्याने राज्याच्या तोंडाला पाने पुसल्याचे चित्र आहे. केवळ राजकारणासाठी व मतांसाठी महाराष्ट्रातील जनतेचा वापर केला जात असल्याचे आता स्पष्ट झाल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post