बापरे..महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी शेगाव येथील हेलिपॅड बांधकामासाठी ४ कोटीच्या खर्चाची निविदा
खामगाव : महामहिम राष्ट्रपती माननीय द्रोपदी मुर्मू यांचा शेगाव दौरा निश्चित झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले असून दौऱ्याच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड बांधकामाकरिता तब्बल ४ कोटी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आल्याची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच काढली आहे. त्यामुळे हेलिपॅड बांधकामावर होणाऱ्या खर्चाबाबत चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.
महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे येत आहे. त्यामुळे प्रशासन त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी कामाला लागले आहे. पोलिस प्रशासन बंदोबस्ताच्या अनुषंगाने विविध सूचना संबधीत विभागाला देत आहे. त्याच अनुषंगाने हेलिपॅड बांधकाम व इतर अनुषांगिक कामे हासुध्दा नियोजनाचा भाग आहे. त्यामुळेच खामगाव सार्वजनिक बाधकाम विभागाने याबाबतची निविदा १३/२/२६जा.क्र.७७०/निविदा/२०२६ ई-निसुक ५१ अशी काढली आहे. हेलिपॅड बांधकामासाठी ४ कोटी १० लाखाचा खर्च अपेक्षीत आहे. तसे निविदेमध्ये नमूद आहे. शासकीय कंत्राटदारांकडून तशा ऑनलाईन निवीदा मागण्यात आल्या आहे. तर लवकरच हेलिपॅड बांधकामाला सुरूवात केल्या जाणार आहे.
साभार दैनिक देशोन्नती

إرسال تعليق