खामगावातून मागणी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकरांची हकालपट्टी करा
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव ः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रूपाली चाकणकरांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दि.२० मार्च रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
![]() |
| जाहिरात |
निवेदनात नमुद आहे की, महाराष्ट्रात महिलांवर अन्याय अत्याचाराचे सत्र सुरूच असून यावर महिला आयोग काहीही बोलायला तयार नाही. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळगिरी येथे दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अण्णा गुंजाळ याने एका अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार केला. लगेच त्याच जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला. एवढे सगळे सुरु असतांना तिसरी गंभीर घटना समोर येते ती, कॅप्टन खरात भोंदूबाबा प्रकरण. ज्याने भक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण केले. त्याहून भयानक गोष्ट म्हणजे या महाराजांच्या छत्रधारी भक्त महिलांची सुरक्षा करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत ही आहे. महिलांची सुरक्षा करणे, त्यांना न्याय मिळवून देणे तर दूरच, उलट त्याच अशा गंभीर प्रकरणात ही व्यक्ती शामिल असणे म्हणजे लांच्छनास्पद आहे. ही बातमी बाहेर आल्याबरोबर समाजात अतिशय चीड आणि संताप निर्माण झाली आहे. जो खरात ज्योतिष्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करतो आणि तसे पुरावेही मिळतात; त्या भोंदूबाबाचे पाय कोण धुतात तर महिलांची सुरक्षा करण्याचे ढोंग करणाऱ्या रुपाली चाकणकर. अशा, अंधश्रद्धा बाळगणाऱ्या, पुरोगामीत्वाचे ढोंग करणाऱ्या आणि बलात्काऱ्याचे पाय धुणाऱ्या स्त्रीला आम्ही महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही. तेव्हा रुपाली चाकणकर यांचा त्वरित राजीनामा घेवून त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अन्यथा जिजाऊ ब्रिगेड कडून राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड बुलडाणा जिल्हाध्यक्ष स्मिताताई संजय ठाकरे, रंजना घिवे, सुधा भिसे, वनिता अरबट, प्रतिभा देशमुख, राधिका सोनोने, संगीता वाघ, निश्चल इंगळे, मोहिनी चेके, शितल दारमोडे, शिला गावंडे, अर्चना ठाकरे, कोमल तायडे, नंदा निकम, नंदा पाटेखेडे, वंदना वानखडे, स्मिता भोसले यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या उपस्थित होत्या.


Post a Comment