संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत इतिहास विषयात
खामगांव अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रा. विजय पुंडे यांना पीएच.डी.
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालय, मलकापूर येथे कार्यरत असलेले इतिहास विषयाचे प्राध्यापक प्रा. विजय पुंडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत इतिहास विषयात पीएच.डी. (आचार्य) पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. पुंडे यांनी आपले संशोधन कार्य जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा येथील इतिहास संशोधन केंद्रात पूर्ण केले. त्यांनी प्रा. डॉ. नामदेव ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली “पश्चिम विदर्भातील वृत्तपत्रांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका : एक ऐतिहासिक अध्ययन” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.
या संशोधन प्रबंधाची खुली मौखिक परीक्षा (ओपन व्हायवा) दि. ९ मार्च रोजी जिजामाता महाविद्यालयात पार पडली. या वेळी यशवंत महाविद्यालय, वर्धा येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. अनंत रिंढे यांनी बहिःस्थ परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांनी अंतर्गत परीक्षक म्हणून सहभाग नोंदविला. या संशोधन कार्यादरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव ढाले यांनी मार्गदर्शक म्हणून त्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
गेल्या जवळपास २० वर्षांपासून गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्रा. पुंडे यांनी आपल्या संशोधनात ऐतिहासिक साधने, दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारे विषयाचे सखोल विश्लेषण मांडले. मौखिक परीक्षेदरम्यान त्यांनी आपल्या संशोधनाचे प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या संशोधनाच्या गुणवत्तेची दखल घेत डॉ. अनंत रिंढे यांनी त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्याची शिफारस केली.
या प्रसंगी डॉ. सुबोध चिंचोले, डॉ. जे. जे. जाधव, डॉ. संतोष कुंभारे, डॉ. अनंत मोरे, डॉ. योगेश रोढे, प्रा. विनय पैकीने तसेच इतिहास विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. विजय पुंडे यांच्या संशोधनामुळे पश्चिम विदर्भातील स्वातंत्र्य चळवळीत स्थानिक वृत्तपत्रांनी निभावलेली भूमिका अधिक स्पष्टपणे समोर येण्यास मदत होणार, असे मत शैक्षणिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.


إرسال تعليق