युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न
खामगाव (प्रतिनिधी) – स्थानिक सूर्योदय एज्युकेशन सोसायटी, खामगाव द्वारे संचालित युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथे १५ दिवसांचे उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले. आज या शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी शिबिरातील विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक पालकांसमोर सादर केले.
युगधर्म पब्लिक स्कूल खामगाव ही शाळा शहरातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आणि जिज्ञासू वृत्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या शिबिरात खामगाव शहरातील ४ ते १० वयोगटातील सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
![]() |
| Advt |
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक, इंग्लिश स्पीकिंग, योगा, ड्रॉइंग, फायरलेस कुकिंग, फोनिक्स, स्विमिंग, क्रीडा, नृत्य, मॅथ मॅजिक, हस्ताक्षर सुधारणा यांसारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमांसाठी खामगाव, शेगाव, अकोला व बुलढाणा येथील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष श्री. गोपालजी अग्रवाल यांनी पालकांना मार्गदर्शन करताना बदलत्या काळानुसार मुलांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच मुलांच्या चेहऱ्यावरचा हास्य त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करते, असेही त्यांनी नमूद केले.
शाळेचे प्राचार्य श्री. अनिरुद्ध आवचार यांनी प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानले तसेच शिबिरातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. संगीता देशमुख, सौ. कल्पना वानखेडे, जिया मॅडम व कांचन मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या इंग्लिश स्पीकिंग प्रात्यक्षिकाचे पालकांनी विशेष कौतुक केले. खामगाव शहरात अशा आगळ्या-वेगळ्या उपक्रमांमुळे युगधर्म पब्लिक स्कूलचे सर्वत्र कौतुक होत आहे.


إرسال تعليق