खामगाव : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना बनावट एसएमएस आणि फेक लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसेच कोणालाही वैयक्तिक माहिती देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महावितरणकडून पाठविण्यात येणारे अधिकृत संदेश हे फक्त VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL किंवा JM-MSEDCL अशा अधिकृत Sender ID वरूनच पाठविले जातात. कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून महावितरण कधीही संदेश पाठवत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशा फसव्या संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाइन बिल भरणा करताना मोबाईल स्क्रीन शेअर करू नये तसेच OTP कोणासोबतही शेअर करू नये, असेही महावितरणने सांगितले आहे. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी तात्काळ जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी किंवा राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم