खामगाव शहराच्या पाणीपुरवठा केंद्रावर अंधाराचे साम्राज्य; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
खामगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाटपुरी रोडवरील मुख्य पाण्याच्या टाकी परिसरात रात्रीच्या वेळी पूर्ण अंधाराचे साम्राज्य असल्याने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण होत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वाल्व (व्हॉल्व्ह) सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना अंधारातच काम करावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर परिसर झाडीने वेढलेला असून रात्रीच्या वेळी येथे विंचू, साप तसेच इतर विषारी प्राण्यांचा धोका कायम असतो. अपुऱ्या प्रकाशामुळे वाल्वपर्यंत पोहोचणे आणि पाणीपुरवठ्याची प्रक्रिया पार पाडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तातडीने उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसवून कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था करावी, तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment