अधिक मासानिमित्त तुळजा माता मंदिरातर्फे रुग्ण व नातेवाईकांसाठी चहा-फराळ सेवा
खामगाव (नितेश मानकर) : शहरातील भाजी मार्केट परिसरातील श्री तुळजा माता मंदिराच्या वतीने अधिक मासानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सामान्य रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी चहा व फराळाचे वितरण करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे ही सेवा केवळ एक-दोन दिवस नव्हे तर संपूर्ण अधिक मासभर अविरतपणे राबविली जात आहे.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक अनेकदा दिवसभर रुग्णांच्या सेवेत व्यस्त असतात. अशा वेळी त्यांना चहा व अल्पोपहार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम तुळजा माता मंदिर समितीने हाती घेतला आहे. या सेवेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत असून उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मंदिर समितीचे पदाधिकारी, भक्तगण व स्वयंसेवक दररोज रुग्णालयात जाऊन चहा व फराळाचे वाटप करीत आहेत. धार्मिक कार्यासोबतच समाजसेवेचा वसा जपत राबविण्यात येणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. अधिक मासाच्या पुण्यपर्वात गरजूंची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची भावना व्यक्त करत समितीने हा उपक्रम अखंड सुरू ठेवला आहे.

Post a Comment