पळून आलेल्या १५ वर्षीय बालकास आईच्या स्वाधीन; रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय रंजन तेलंग यांची तत्पर कामगिरी
शेगाव, दि. २२ : आईने रागावल्यामुळे घरातून न सांगता निघून आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सतर्कतेमुळे सुरक्षितपणे शोधून त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाचे सहायक उपनिरीक्षक (एएसआय) रंजन तेलंग यांनी तत्परता दाखवत महत्त्वाची भूमिका बजावली.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील १५ वर्षीय मुलगा आईच्या रागावण्यामुळे घरातून निघून शेगाव रेल्वे स्थानकावर आला होता. स्थानकावर त्याच्या चेहऱ्यावरील घाबरलेले व संशयास्पद हावभाव पाहून स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे यांनी तत्काळ रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय रंजन तेलंग यांना माहिती दिली. तेलंग यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून मुलाला ताब्यात घेतले व विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलाने आई रागावल्यामुळे कोणालाही न सांगता घर सोडल्याची कबुली दिली.यानंतर एएसआय रंजन तेलंग यांनी मुलाकडून त्याच्या आईचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधला. मुलगा सुरक्षित असल्याची माहिती मिळताच त्याची आई अकोल्याहून तातडीने शेगाव येथे पोहोचली. मुलाला सुखरूप पाहताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.त्यानंतर एएसआय रंजन तेलंग यांनी मुलाचे समुपदेशन केले. तसेच बाल कल्याण समितीची आवश्यक परवानगी घेऊन सर्व कायदेशीर व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले.मुलाची सुखरूप भेट झाल्याने भावूक झालेल्या आईने रेल्वे सुरक्षा बल तसेच एएसआय रंजन तेलंग यांचे मनःपूर्वक आभार मानले. या तत्पर आणि संवेदनशील कार्याबद्दल रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment