अबब..! रात्रीच्या अंधारात ४० बकऱ्यांची चोरी; आडगावातील पशुपालकाचे मोठे नुकसान
खामगाव, दि. २७ : खामगाव तालुक्यातील आडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत एका पशुपालकाच्या तब्बल ४० बकऱ्या पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील प्रल्हाद तेलगोटे हे आपल्या घरी झोपलेले असताना रात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोठ्यातून ४० बकऱ्या चोरून नेल्या. सकाळी गोठा रिकामा दिसताच चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत पशुपालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाढत्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील पशुपालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्ष राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Post a Comment