खामगाव ( नितेश मानकर ) बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांना यंदाचा ‘स्व. ना. गो. अनोकार उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार–२०२६’ जाहीर झाला आहे. बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता वारकरी भवन, चोपडे यांचा मळा, खामगाव येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्व. ना. गो. अनोकार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनोकार परिवारातर्फे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरूप ₹२१ हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे आहे.

राजेंद्र काळे यांनी अनेक वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, प्रशासकीय व जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली आहे. दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी पत्रकार संघटनांमध्येही सक्रिय भूमिका बजावली असून, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत यंदाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला साहित्यिक स्पर्शही लाभणार असून, स्व. ना. गो. अनोकार यांच्या सुविद्य पत्नी व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती उषा नागोराव अनोकार यांनी संकलित केलेल्या ‘वेचलेले मोती’ या पुस्तकाचे प्रकाशनही याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्राचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.

या सोहळ्यास उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, अपर पोलीस अधीक्षक पियुष विलास जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सुनील पाटील, नगराध्यक्षा अपर्णा सागर फुंडकर, मुख्याधिकारी प्रशांत शेळके, तसेच विविध शासकीय अधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशनानंतर मान्यवरांचे मनोगत होणार असून कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने होईल.

या पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास पत्रकार, साहित्यप्रेमी, नागरिक आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती उषा नागोराव अनोकार, ॲड. क्षितीज नागोराव अनोकार आणि डॉ. दुर्गेश नागोराव अनोकार यांनी अनोकार परिवाराच्या वतीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post