धुरंदरला भेटणार मोना.....
ज्ञानगंगा अभयारण्यात मोना नावाची वाघीण सोडली
खामगाव मतदारसंघातील ज्ञानगंगा अभयारण्यात व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 'मोना' या मादी वाघिणीचे यशस्वी स्थलांतरण करण्यात आले असून, अवघ्या सहा महिन्यांत अभयारण्यात दाखल झालेला हा दुसरा वाघ आहे. यापूर्वी 'धुरंधर' या नर वाघाचे पुनर्वसन करण्यात आले होते.
ज्ञानगंगा अभयारण्यात जैवविविधतेत वाढ व्हावी, व्याघ्र संवर्धनाला चालना मिळावी आणि नैसर्गिक अधिवास अधिक समृद्ध व्हावा, यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात आलेल्या 'मोना' वाघिणीला माटरगाव धरण परिसरात सोडण्यात आले. विशेष म्हणजे, 'धुरंधर' नर वाघाच्या अधिवासापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर तिचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
प्रतिकूल हवामानामुळे वाघिणीला रात्री सोडण्याचा निर्णय बदलून संपूर्ण प्रक्रिया पहाटे सुमारे ५.३० वाजेपर्यंत अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली. या मोहिमेचा आढावा कामगार मंत्री तथा खामगावचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून घेतला. यावेळी विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) यशवंत नागुलवार, सहायक वनसंरक्षक चेतन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वन विभागाच्या मते, 'मोना' वाघिणीच्या आगमनामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात नैसर्गिक व्याघ्र प्रजननाला चालना मिळणार असून जैवविविधता अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. भविष्यात वन्यजीव पर्यटनालाही याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्याच्या संवर्धनासाठी हे स्थलांतरण एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


Post a Comment