खामगावात दामिनी पथकाची सक्रिय; शाळा-महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांवर वचक
खामगाव : शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खामगाव शहर पोलिसांचे दामिनी पथक पुन्हा सक्रिय झाले असून, शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनाकारण घुटमळणारे, टवाळकी करणारे तसेच विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या संशयित युवकांची कसून चौकशी करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात आली.
दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आणि गर्दीच्या परिसरात भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना कोणताही त्रास होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच टवाळखोरांना कठोर समज देत पुन्हा असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला.
महिला व विद्यार्थिनींना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे, तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात शिस्त कायम राहावी, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. शहरात अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही नियमित सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Post a Comment