बुलढाणा जिल्ह्यातील १२ माजी सैनिकांचा 'सैनिक रत्न' पुरस्काराने गौरव

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त श्री शिवाजी महाराज सभागृह, दादर (मुंबई) येथे सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने भव्य 'सैनिक रत्न पुरस्कार वितरण सोहळा' उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रिगेडियर (नि.) सुधीर सावंत (अध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य), जनरल सेक्रेटरी डी. एफ. निंबाळकर तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या प्रतिष्ठित सोहळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील १२ माजी सैनिकांना 'सैनिक रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानित वीरांमध्ये जिल्हाध्यक्ष रामराव वामनराव देशमुख, सुभेदार ज्ञानेश्वर तायडे, हवालदार बळवंत नानाराव देशमुख, हवालदार शंकर खंडारे, हवालदार शंकर चौकशे, नायक रवींद्र पवार, नायब सुभेदार अंबादास गणगे, नायक मधुकर सुर्वे, नायक मंगेश खीरडकर, सुभेदार चंद्रकांत पहुरकर, सुभेदार मेजर संजय माझोडकर आणि हवालदार ज्ञानदेव गायकवाड यांचा समावेश होता.

खामगाव शहरातून एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने माजी सैनिकांना 'सैनिक रत्न' पुरस्कार प्राप्त होणे हा इतिहासातील अभिमानास्पद आणि सुवर्णक्षण ठरला असून, ही बाब नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.देशाच्या संरक्षणासाठी सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून हिमालयातील बर्फाच्छादित सीमा, दुर्गम दऱ्या-खोऱ्या, उष्ण रेगिस्तान आणि सीमावर्ती भागात जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बजावतात. त्यांच्या या अतुलनीय त्यागाचा आणि समर्पणाचा सन्मान म्हणून खामगाव येथे शहीद स्मारक व सैनिक भवन उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भावनिक व रास्त मागणी आजी-माजी सैनिक कल्याणकारी बहुउद्देशीय संघटना, खामगाव (नोंदणी क्र. २६३/२५) यांनी शासन व स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

या उपक्रमामुळे भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सैनिकांविषयी आदराची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post