मुंबई, १० ऑगस्ट २०२६ : राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर आता कठोर कारवाई होणार आहे. शासनाने आज, १० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासकीय परिपत्रकानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत असलेली सर्व नवीन तसेच विद्यमान अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडून अथवा निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त/पोलीस प्रशासन यांच्यावर संयुक्त जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे वेळेत हटविण्यात यावीत, यासाठी संबंधित प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
तसेच कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यबिंदूपासून ४० मीटरच्या अंतरापर्यंत निवासी वापरासाठी आणि ७५ मीटरच्या अंतरापर्यंत व्यावसायिक वापरासाठी जमिनीचा वापर बदलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गालगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या आगामी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق