ब्रह्माकुमारीज विद्यालयात नवदुर्गा उत्सव उत्साहात संपन्न

७० कलशांची स्थापना; नऊ दिवस राजयोग साधना, चैतन्य नवदुर्गा दर्शन, कन्यापूजन व विश्वशांतीसाठी हवन

खामगाव : ब्रह्माकुमारीज विद्यालय, रायगड कॉलनी येथील शिवालय सेवा केंद्रात नवरात्रीनिमित्त आयोजित नवदुर्गा उत्सव विविध आध्यात्मिक उपक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना करून ७० कलशांची स्थापना करण्यात आली. मनुष्याच्या अंतर्मनातील दैवी गुण जागृत करून जीवनात पवित्रता, शांती व सकारात्मकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नऊ दिवस राजयोग साधनेचे आयोजन करण्यात आले होते.

या काळात दररोज ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ ते ५, सकाळी ६ ते ७ आणि सायंकाळी ६ ते ७.३० अशा तीन सत्रांमध्ये योगसाधना घेण्यात आली. या साधनेतून आत्मिक शक्ती वाढवणे, मनोविकारांवर विजय मिळवणे आणि दैवी गुणांचे जीवनात संवर्धन करणे यावर भर देण्यात आला.

रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी अष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सबझोन इन्चार्ज राजयोगिनी ब्रह्माकुमारी तपस्विनी रुक्मिणी दीदी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवा केंद्र संचालिका शकुंतला दीदी, सुषमा दीदी, दिव्या दीदी आणि वैशाली दीदी यांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर लहान बालिकांनी साकारलेल्या चैतन्य नवदुर्गा दर्शनाच्या देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये कु. आधिश्री दीपके हिने दुर्गादेवी, कु. धनिष्ठा दीपके हिने कालीमाता, कु. अवंती गोरे हिने तुळजाभवानी, कु. वृंदा गोरे हिने सरस्वतीदेवी, कु. वेदांती गोरे हिने लक्ष्मीदेवी, कु. कृतिका अगीनकर हिने संतोषी माता, कु. श्रेया इंगळे हिने वैष्णवी माता, कु. वैभवी जाधव हिने पार्वतीदेवी, कु. हिमांशी पालीवाल हिने गायत्री माता, तर कु. रितिका शेलारका हिने जगदंबा मातेची भूमिका साकारली.


याप्रसंगी कुमारी आयुषी आणि कुमारी देविका या कन्यांनी देवीच्या महिम्यावर आधारित अतिशय सुंदर व मनमोहक नृत्य सादर केले. आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्यातून त्यांनी देवीच्या महिमेचे भावपूर्ण दर्शन घडवले आणि उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या सुंदर नृत्यप्रस्तुतीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

'निरागस व पवित्र मन हीच पूजनीयतेची खरी ओळख' हा आध्यात्मिक संदेश देत कन्यापूजन करण्यात आले. कन्यांमधील पवित्रता, निरागसता आणि दैवी गुणांचे प्रतीक म्हणून त्यांना संस्थेतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.

यानंतर मनातील विकार, नकारात्मक विचार आणि अवगुण यांची आहुती देऊन आत्मशुद्धीचा संकल्प करण्याच्या भावनेतून हवन विधी संपन्न झाला. यावेळी विश्वशांती आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच प्रत्येकाला दैवी गुणांची आठवण करून देणारे गुलाबपुष्प अर्पण करण्यात आले.

आध्यात्मिक साधना, कन्यापूजन, चैतन्य नवदुर्गा दर्शन आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दैवी शक्तीचे जागरण म्हणजे केवळ देवीचे पूजन नव्हे, तर स्वतःमधील पवित्रता, प्रेम, शांती आणि शक्ती या गुणांना जागृत करणे, हा संदेश या उत्सवातून देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post